तरुणाने घातला बदलीसाठी पोलिसांनाच १३.६० लाखांचा गंडा

सांगली येथे राज्य महामार्ग वाहतूक पथकाकडे बदली करण्याच्या आमिषाने कोल्हापूर पोलीस दलातील हवालदारासह सहा पोलिसांना 13 लाख 60 हजाराचा गंडा घालणारा मुख्य सूत्रधार मनोज सबनीस याचा साथीदार संतोष यशवंत खरात राहणार सांगलीवाडी यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आज (मंगळवार) पहाटे छापा टाकून जेरबंद केले. पोलिसांच्या बदली फसवणूक प्रकरणात संशयित संतोष खरात याचा थेट सहभाग असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

फसवणुकीच्या कटात संतोष खरात यांच्यासह सांगली मिरजेतील आणखी काही तरुणांची नावे निष्पन्न झाली आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी सांगितले.

मुख्य संशयित मनोज सबनीस याने हवालदरासह पोलिसांकडून घेतलेले पैसे संतोष खरात याच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा केल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे. फसवणूक प्रकरणी संतोष खरात याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने सांगली (सांगलीवाडी) येथील त्याच्या घरावर छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. पहाटे ही कारवाई झाली. खरात याच्या प्राथमिक चौकशीत टोळीतील आणखी काही तरुणांची नावे पुढे आली आहेत. संबंधितांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे कळमकर यांनी सांगितले.

Scroll to Top