वाई/प्रतिनिधी
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागामार्फत आयोजित ‘नेट सेट परीक्षा मार्गदर्शन’ ही एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, सातारा येथील डॉ. अवधूत कदम तर मार्गदर्शक म्हणून प्रा. दीपाली पाटील, प्रा.मंजिरी पिसाळ व प्रा. प्रियांका जाधव ह्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे हे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ.हणमंत कणसे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे आणि कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. संदीप वाटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.कदम म्हणाले ‘आजचे युग हे स्पर्धात्मक असून कोणत्याही क्षेत्रात टिकण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे. प्राध्यापक होण्यासाठी नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. अभ्यासाचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास कोणतेही यश दूर असत नाही’
अध्यक्षीय मनॊगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले ‘ नेट सेट परीक्षा केवळ प्राध्यापक होण्यासाठी महत्वाचे नसून तिच्या माध्यमातून संशोधनाचे कार्य करताना शासनाकडून मोठ्या रकमेची शिष्यवृत्तीही मिळते. जिद्द, मेहनत आणि चिकाटीने यश प्राप्त करता येते. रसायनशास्त्र विषयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे संशोधनातील कार्य हे उल्लेखनीय असून विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कार्यशाळेसाठी त्यांनी विभागाला धन्यवाद दिले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे यांना राष्ट्रीय स्तरावरील क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे यांनी त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याबद्दल त्यांचा रसायनशास्त्र विभागाच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.
विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. हणमंत कणसे म्हणाले ‘ रसायनशास्त्र विभागाचे संशोधन कार्य हे केवळ राष्ट्रीय पातळीवर नसून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचले आहे. प्रा. दीपाली पाटील, प्रा.मंजिरी पिसाळ व प्रा. प्रियांका जाधव यांनी अनुक्रमे ऑरगॅनिक, अनालायटिकल व इनऑरगॅनिक या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा. (डॉ.) झांबरे यांनी नेट सेट विषयक कार्यशाळेचा उद्देश सांगितला. महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये रसायनशास्त्र विभागाला यशाची मोठी परंपरा असून विद्यार्थ्यांनी ती कायम ठेवावी असे आवाहन ही त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे डॉ. कदम यांना नुकतीच पीएच.डी. प्राप्त झाल्याबद्दल तसेच प्रा. पिसाळ यांची एमपीएससी मधून अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल, प्रा. (डॉ.) झांबरे, डॉ. वाटेगावकर, प्रा.सौ. पाटील, विद्यार्थी मृगेंद्र गुरव, नेहा निंबाळकर, साक्षी शिंदे यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाल्याबद्दल, प्रा. अजित पांढरे व प्रा. धनश्री शिर्के हे पीएच.डी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल, कु. प्रीती कोचळे हिने राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल तसेच स्वामिनी पवार, ओंकार वाघ, सुयोग मोरे, सानिका इंगवले यांनी अविष्कार संशोधन स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा जायगुडे व प्रा. अक्षदा संकपाळ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.निकिता सुर्वे यांनी करून दिला, तर आभार डॉ.संदीप वाटेगावकर यांनी मानले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विषयातील प्राध्यापिका ऋतुजा भोईटे, इतर प्राध्यापक तसेच भास्कर घोणे, अनिल सावंत, अनिल शेलार, अनिल बोडरे, चेतन तावरे, किशोर पिसाळ, शुभम पिसाळ यांनी परिश्रम घेतले.