भरधाव दुचाकीने धडक दिल्याने चक्रेश्वरवाडी (ता. राधानगरी) येथील महिलेचा मृत्यू झाला. साताबाई मारुती वायंगणकर (वय 54) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा मुलगा अनिल मारुती वायंगणकर (29) हा देखील या अपघातात जखमी झाला. खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) ग्रामपंचायत कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला.
आठवड्यापूर्वी नातेवाईकाचे निधन झाल्याने त्यांच्या सांत्वनासाठी आई व मुलगा गेले होते. तेथून चक्रेश्वरवाडीकडे दुपारी परत येत होते. पाठीमागून भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने जोरात धडक दिल्याने आईसह मुलगा रस्त्यावर जोरात कोसळले. महिलेच्या डोक्याला इजा झाली. त्या बेशुद्ध झाल्या. जखमी अवस्थेतील साताबाई यांच्यासह मुलाला नातेवाईकांसह ग्रामस्थांनी तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, महिलेचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. नातेवाईक, ग्रामस्थांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. सीपीआर पोलिस चौकीमध्ये घटनेची नोंद झाली आहे.
