कोल्हापूर खंडपीठासाठी जिल्हा बार असो. तर्फे अंबाबाईला साकडे

कोल्हापूर / प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या करवीरनिवासिनी वतीने अंबाबाईला शुक्रवारी सकाळी साकडे घालण्यात आले. जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. सर्जेराव खोत यांच्या हस्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंबाबाईला अभिषेक घालण्यात आला.
यावेळी सेक्रेटरी निशिकांत पाटोळे, राजू ओतारी, कर्णकुमार पाटील, सागर घोरपडे, चंद्रकांत कुरणे, महिला प्रतिनिधी सोनाली शेठ, स्नेहलता सावंत, सरिता घोरपडे, रोहिणी भोसले, गीता इंगळे यांच्यासह शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबा कोंडेकर, कागल हातकणंगले मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन तथा फाईव्ह स्टार एमआयडीसीचे अध्यक्ष मोहन कुशिरे यांच्यासह वकील उपस्थित होते.
पंढरपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश चौगुले, उपाध्यक्ष महेश कसबे, अभयसिंह देशमुख, सांगोला बारचे मारुती ढाळे, मंगळवेढा बारच्या अध्यक्षा सुहासिनी देव यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला सकाळी साकडे घातले. सकाळी उत्सव मूर्तीसह विठ्ठल मंदिरात नामदेव पायरीपासून आभार यात्रेचा भाग म्हणून कोल्हापूरकडे प्रस्थान केले. सायंकाळी चार वाजता त्यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले.
खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. सर्जेराव खोत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रथयात्रेचे स्वागत केले. खंडपीठ कृती समितीचे सदस्य संभाजीराव मोहिते यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीस पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top