कुरुंदवाडच्या पाणी पुरवठा योजनेबाबत पाठपुरावा करु

कुरुंदवाड/प्रतिनिधी

कुरुंदवाड शहराच्या बहुचर्चित पाणीपुरवठा योजनेबाबत मागणी करत सुरू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनास काँग्रेस पक्षाने ठाम पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देत आंदोलकांची कैफियत ऐकून घेतली व या विषयावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
गेल्या दहा दिवसांपासून सर्वपक्षीय कुरुंदवाड शहर कृती कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलन स्थळी आलेल्या भेटीदरम्यान कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी आमदार पाटील यांना पाणीपुरवठा योजनेच्या अद्याप प्रलंबित असलेल्या प्रशासकीय मान्यतेविषयी सविस्तर माहिती दिली.
त्यावर आमदार पाटील म्हणाले की, “कोणतीही योजना कार्यान्वित होण्यासाठी शासनाची प्रशासकीय मान्यता आवश्यक असते. कुरुंदवाडच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा योजनेला लवकरात लवकर मान्यता मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करू. “यावेळी राजू आवळे, प्रफुल्ल पाटील, विजय पाटील, दादासाहेब पाटील, सुनील माळी, सुरेश हलवाई, तानाजी आलासे, राजू बेले, जितेंद्र साळुंखे, विजयकुमार माने, अर्षद बागवान, अनिकेत बेले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top