रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी प्रयत्नशील आम. राहूल आवाडे

इचलकरंजी/ प्रतिनिधी

शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ५२ कोटी रुपयांची रस्त्याची कामे सुरु आहेत. मात्र, एकाही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. सदरचे काम पावसाळ्यापूर्वी दर्जेदार व्हावेत यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आम. राहुल आवाडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान इचलकरंजीतील आणखीन काही रस्त्यांसाठी आणखी ४८ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याचे त्यांनी सांगीतले.
इचलकरंजी शहरात विविध भागात ५२ कोटीचे रस्ते करण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामासंदर्भात विविध स्तरातून तक्रारी येत आहेत. येणाऱ्या तक्रारींचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या समन्वयातून निपटाराही करण्यात येत आहे. तीनबत्ती चार रस्ता ते जुना चंदूर रस्त्याचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचे तक्रारी होत्या. या अनुषंगाने आमदार आवाडे यांनी गुरूवारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यासोबत कलानगर परिसरात पाहणी केली. या पाहणीनंतर आमदार आवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ५२ कोटी रुपये खर्चातील शहरातील अद्याप कोणत्याही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी वैयक्तिक लक्ष असून स्वतंत्र खासगी ३ अभियंते नियुक्त केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागासही कामे दर्जेदार व्हावीत यासाठी सूचना दिल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले. यावेळी महापालिकेचे बांधकाम अभियंता महेंद्र क्षीरसागर, बाजी कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संतोष पाटील, दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, नितेश पोवार, सुनील तोडकर उपस्थित होते.

Scroll to Top