मलकापूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत

कराड / प्रतिनिधी

मलकापूर शहरातील काही भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा आता पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरळीत करण्यात आला आहे. नगरपालिकेमार्फत नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करणारी यंत्रणा कार्यरत असून, सध्यस्थितीत संपूर्ण शहरात नियमित जलपुरवठा सुरू आहे.
मलकापूर पालिके मार्फ त शहरातील एकूण ८,९६३ नळजोडणीधारकांना २४ तास जलपुरवठा केला जातो. या योजने अंतर्गत प्रतिदिन १३ एमएलडी पाणी कोयना नदीवरील जॅकवेलमधून उचलून आगा शिवनगर येथील जल शुद्धीकरण केंद्रात आणले जाते. पाणी शुद्ध केल्यानंतर ते पाणी शहरातील विविध भागात असलेल्या पाच साठवण टाक्यांमार्फत वितरित केले जाते. मात्र, मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेअंतर्गत सर्व साठवण टाक्या स्वच्छ करण्यासाठी त्या रिकाम्या करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी कोयना नदीतील पाण्याची गढुळता वाढल्यामुळे शुद्धीकरण प्रक्रियेस अधिक वेळ लागला. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने टाक्या पूर्ण क्षमतेने भरता आल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर फॉरेस्ट ऑफिस जवळील मुख्य साठवण टाकी अचानक रिकामी झाल्याने पाईप लाईनमध्ये ‘एअर ब्लॉकेज’ निर्माण झाले. त्यामुळे ता. ६ ते ८ जून २०२५ या कालावधीत त्रिमूर्ती कॉलनी, अभिनव कॉलनी, शिवपर्वत कॉलनी, तडकवस्ती, गणेशकॉलनी आणि वांगव्हॅली कॉलनी या भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने झाला. मात्र शहराच्या इतर भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होता. या काळात नगर पालिकेमार्फत टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांनी तातडीने दुरुस्तीच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यानंतर ९ जून रोजी जलपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. भविष्यात अशा अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून त्यांनी यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा खंडीत किंवा कमी दाबाने होणार असल्यास नागरिकांना वेळेवर सूचित करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

Scroll to Top