
जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्यात येणार आहे. माळवाडी (ता. पलूस) ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे. झेडपीच्या शाळेत प्रवेश घेतल्यास करमाफी करणारी ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.
माळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश वाढीसाठी सरपंच अश्विनी साळुंखे यांनी प्रस्ताव मांडला. याला सुनील खोत यांनी अनुमोदन दिले. याबाबत ग्रामपंचायतीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते झेडपीच्या शाळेत पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या पालकांची एक वर्षाची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेची भौतिक आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी जिल्ह्यात मॉडेल स्कूल हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अनेक शाळांचे रूप पालटले आहे. परिणामी पटसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातही झेडपीच्या शाळेच्या करमाफीबाबत एका ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. सांगली जिल्ह्यातही असा निर्णय घेतल्याने याचे कौतुक होत आहे.
