जयसिंगपूर/ प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी होणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव घुणकीकर यांनी दिली. सकाळी ९:३० वाजता शिव ध्वज पूजन तर १०:३० वाजता शिवप्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शिव पुतळा पूजन होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीकांत नलावडे असणार आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, माजी नगराध्यक्ष नीता माने आदी उपस्थित राहणार आहेत. मैत्री फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले आहे.
याशिवाय सकाळी साडेदहा वाजता शिरोळ तालुका मराठा मंडळ येथे शालेय मुलांच्या रांगोळी व निबंध स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पाटील असणार आहेत. यावेळी माजी प्राचार्य राजेंद्र कुंभार उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी जयसिंगपूर शहरात शिवमुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असून यावेळी आमदार अशोकराव माने, दत्त कारखान्याचे माजी चेअरमन गणपतराव पाटील, गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे, राजवर्धन नाईक निंबाळकर, सावकार मादनाईक पृथ्वीराज यादव, बाळासाहेब भांदिगरे, उपस्थित राहणार आहेत. शिवभक्तांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जाधव घुणकीकर यांनी केले आहे.
