वडणगे-शिये चौकात रस्त्याकडेच्या चरीत अडकली केएमटी

वडणगे/प्रतिनिधी

वडणगे-शिये मार्गावर येथील संघर्ष चौकात केएमटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या चरीत अडकली. यामुळे काहीवेळ या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. जेसीबीच्या सहायाने बस बाहेर काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. बसमध्ये प्रवासी होते. बसचालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवल्याने कोणालाही इजा झाली नाही. संघर्ष चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथे एकेरी वाहतूक सुरू आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता कोल्हापूरकडून जठारवाडीकडे केएमटी बस जात होती. याचवेळी शियेकडून वडणगे फाट्याकडे उसाचा ट्रॅक्टर जात होता. ट्रॅक्टरला मार्ग देताना केएमटी बस चालकाला अंदाज न आल्याने बस रस्त्याच्या बाजूला गटर्ससाठी खोदलेल्या चरीत अडकली. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. अर्ध्या तासात स्थानिक तरुणांनी जेसीबी आणून बस बाहेर काढली.

Scroll to Top