
उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यावेळी रविवारी पाटाकडील तालीम मंडळ व शिवाजी तरुण मंडळाचे खेळाडू मैदानात एकमेकांना भिडले. हुल्लडबाजांकडून चप्पल, बाटल्या फेकण्यात आल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर हजारो फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीत रंगलेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघांतील खेळाडूंत झालेल्या चढाओढ, ढकलाढकलीचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही संघांतील खेळाडू, संघ व्यवस्थापक व प्रशिक्षकही एकमेकांच्या अंगावर धावले. यामुळे मैदानात फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. दोन्ही संघांच्या समर्थकांनाही चेव चढला. त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून चपला, पाण्याच्या बाटल्या मैदानात फेकल्या. यामुळे वातावरण तंग झाले. शेवटी स्पर्धा संयोजक, पंच व पोलिसांनी मैदानात धाव घेतली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे सुमारे अर्धा तास सामना थांबला होता.
उत्तरेश्वर तालीम मंडळ आयोजित उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी झाला. पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामन्यात पाटाकडीलने 2-0 अशी आघाडी मिळविली. सामना संपण्यास अवघ्या पाच मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना पाटाकडील तालीम मंडळाचा खेळाडू ओंकार मोरे व शिवाजी तरुण मंडळाचा खेळाडू संकेत नि. साळोखे यांच्यातील ढकलाढकलीचे रूपांतर हाणामारीत झाले. इतर खेळाडूंनी त्यांना रोखायचे सोडून एकमेकांच्या अंगावर धाव घेत फ्री स्टाईल हाणामारी सुरू केली. राखीव खेळाडू, संघ व्यवस्थापक व प्रशिक्षकांनीही एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दोन्ही संघाच्या समर्थक, हुल्लडबाजांनी पाण्याच्या बाटल्या, चपलांसह हाताला लागेल त्या वस्तू मैदानात भिरकावल्या. प्रचंड गोंधळ करत अश्लील शिवीगाळ, घोषणाबाजी करत वातावरण तणावपूर्ण बनविले. अखेर पंच, संयोजन समिती व पोलिसांनी मैदानात धाव घेत हाणामारी करणार्या खेळाडूंना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
मैदानातील खेळाडूंच्या हाणामारीच्या प्रकारानंतर वातावरण तंग झाले होते. दोन्ही संघातील समर्थकांकडून जोरदार शिवीगाळ सुरूच होती. पोलिस कारवाईची पर्वा न करता त्यांच्याकडून हुल्लडबाजी सुरू होती. यामुळे सामाना संपल्यानंतर मैदानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सामन्यात हाणामारी करणार्या दोन्ही संघांतील 11 खेळाडूंवर पंचांनी रेड कार्डची कारवाई केली. यात पाटाकडीलच्या यश देवणे, ऋतुराज सूर्यवंशी, ऋषीकेश मेथे-पाटील, ओंकार मोरे यांच्यासह राखीव खेळाडू जय कामत व रोहित पोवार यांच्यावर रेड कार्डची कारवाई करण्यात आली. तर व्यवस्थापक धनंजय यादव, प्रशिक्षक सैफ हकीम, गोलरक्षक राजू मिरीयाला यांच्यावर यलो कार्डची कारवाई करण्यात आली. शिवाजी तरुण मंडळच्या करण चव्हाण-बंदरे, संकेत नि. साळोखे, विशाल पाटील, सुयश हंडे, राखीव खेळाडू अमन सय्यद यांच्यावर रेड कार्डची कारवाई करण्यात आली. अभिषेक देसाईवर यलो कार्डची कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर 7-7 खेळाडूंच्यात उर्वरित सामना झाला. यात पाटाकडीलने 2-0 असा विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले.
