ढगांचा गडगडाट आणि जोरदार वार्यासह पावसाने मंगळवारी सायंकाळी सांगली-मिरज शहरांना झोडपून काढले. जतपासून शिराळ्यापर्यंत जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, तडवळे (ता. शिराळा) येथे वीज पडल्याने शेतात भांगलणीसाठी गेलेल्या सुनंदा पांडुरंग पाटील (वय 45) या महिलेचा मृत्यू झाला.
सांगली-मिरज परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मिरजेत वानलेस रुग्णालय परिसरातील झाडांच्या फांद्या पडल्या. महात्मा गांधी चौकातील एका हॉटेलचे सोलर पॅनल उडून गेले. दुकानांचे डिजिटल फलकही तुटले. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील दुय्यम बाजार आवाराजवळील जुन्या अन्नपूर्णा हॉटेलजवळ झाड उन्मळून पडले. येथील एक हॉटेल, इंटरनेट कॅफे, चायनीज हातगाड्यांचे नुकसान झाले. पलूस व तासगाव तालुक्यांतील विविध गावांमध्ये या पावसामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसला आहे. बागायतदारांचे कोट्यवधीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
शिराळा व परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते सव्वासहापर्यंत विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला. शिराळा-औंढी रस्त्यावर मोठे झाड उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शिराळा, बिऊर, नाथ मंदिर परिसरात मोठा पाऊस झाला. जत तालुक्यातही ठिकठिकाणी दमदार पाऊस झाला. तिकोंडी परिसरात गारपिटीमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. वादळी वार्यामुळे द्राक्षबागा उन्मळून पडल्या. रॅकवरील बेदाण्यालाही फटका बसला.

