कोल्हापूर/राशिवडे / प्रतिनिधी
परिते (ता. करवीर) येथे दोन वेगवेगळ्या घटनेत गव्याने केलेल्या हल्ल्यात तरुणासह दोघेजण जखमी झाले. प्रतीक गणपती पाटील (वय २१) व साताप्पा कुंडलिक पाटील (४८, रा. परिते, करवीर) अशी त्यांची नावे आहेत. रविवारी दुपारी ही घटना घडली. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रतीक पाटील सकाळी शेतात काम करीत असताना गव्याने त्याच्यावर हल्ला केला. पोटाला डाव्या बाजूला इजा झाल्याने त्यास शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तर साताप्पा पाटील हे शेतात बांधावरून जात असताना गव्याने त्यांना धडक दिली. त्यांनाही गंभीर इजा झाली आहे. त्यांनाही उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीपीआर पोलिस चौकीमध्ये घटनेची नोंद झाली आहे.
