तुलसी विवाह

तुलसी विवाह

तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते.
हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे.हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.

घरातीलच कन्या मानून, घरातील तुळशी वृंदावनाची वा कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवितात.त्यावर बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा असे लिहितात. बोर, चिंच, आवळा, सिताफळ, कांद्याची पात त्यात ठेवतात. कर्त्याने स्ब्नान करून बाळकृष्णाचे पूजन करावे.स्नान या उपचारापर्यंत तुलस आणि कृष्णाचे पूजन करतात. नंतर त्यांना हळद व तेल लावून त्यांना मंगल स्नान घालतात.तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात.

पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणुन त्यांचा विवाह लावला जातो. कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे.घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे.या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे.

तुलसी विवाहाच्या निमित्ताने तुळशीच्या औषधी गुणधर्माकडे पाहण्याची दृष्टी मिळायला हवी. या निमित्ताने हवा शुद्ध करणाऱ्या व औषधी उपयोग असलेल्या तुळशीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जावी.

तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळसी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते.

वरील माहिती आमच्या वाचनात आली असून आम्ही याच्याशी सहमत आहोतच असे नाही .

Scroll to Top