आदमापूर / प्रतिनिधी
श्रीक्षेत्र आदमापूर (ता. *भुदरगड) येथील बाळूमामा देवालयाच्या अमावस्या यात्रेवेळी सुमारे चार* ते पाच तास वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे पोलीस प्रशासन व देवस्थान समिती विरोधात भाविकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.
प्रत्येक अमावस्या यात्रेला वाहतुकीच्या कोंडीला भाविकांना सामोरे जावे लागत असताना प्रशासनातर्फे कोणतीही दखल अथवा उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होताना दिसत आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग येणार का? पोलीस यंत्रणा सतर्क होणार का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. राधानगरी-निपाणी रस्त्यावर मुरगूड-मुदाळतिट्टा सात किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागून राहिल्या होत्या. भंडारा यात्रेला एकेरी वाहतुकीचे जे नियोजन केले होते ते नियोजन अमावस्या यात्रेला केले असते तर वाहतुकीची कोंडी झाली नसती. कोट्यवधी रुपये खर्च करून उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला तसेच मुदाळतिट्टा ते निढोरी दरम्यान असणाऱ्या तीन किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडतो. यामुळे या कोंडीचा सामना भाविकांना करावा लागतो. मंदिराजवळ वाहनतळ असताना देखील भाविकांकडून रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जातात. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.

