कोल्हापूर खंडपीठ होण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल-पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर/ प्रतिनिधी

कोल्हापूरसह आसपासच्या सहाही जिल्ह्यातील वकील व पक्षकारांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ होण्याची मोठी गरज आहे. खंडपीठ झाल्यास कोल्हापूरची सर्वच स्तरावर मोठी प्रगती होणार असल्याने नजीकच्या काळात शासनाकडून कोल्हापूर खंडपीठाची अधिकृत घोषणा होण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतेच येथे केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ होण्यासाठी खंडपीठ कृतीसमिती पुरस्कृत पदवीधर मित्रचे अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर हे दसरा चौक येथे रविवार ता. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. आमरण उपोषणास बसणार आहेत. तसेच याच प्रश्नावर ता. १८ फेब्रुवारी रोजी समस्त वकील, पक्षकार व जनतेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य व लक्ष्यवेधी महारॅली काढण्यात येणार आहे. याबाबत माणिक पाटील यांनी पालकमंत्र्यांची भेट घेवून त्यांना सविस्तर माहिती दिली. याविषयी लगेचच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करु असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी कोल्हापूर जिल्हा रेशन दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र मोरे, कोल्हापुर युथ फाऊंडेशन अध्यक्ष डॉ. अजित राजगिरे, रमेश पाटील आदी उपस्थित होते.

Scroll to Top