गारगोटी / प्रतिनिधी
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक गारगोटी कचेरीचे जतन व संवर्धन व्हावे, ती इमारत पाडण्यात येऊ नये यासाठी आज पासून गारगोटी (ता. भुदरगड) येथे हुतात्मा स्मारक बचाव कृती समितीच्यावतीने भुदरगड कचेरी वाचवणेसाठी ठिय्या आंदोलनास सुरवात झाली. १२ जून पासून १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत हे ठिय्या आंदोलन चालणार आहे.
आज ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली, प्रारंभी या कचेरीवर हल्ला करताना हुतात्मा झालेल्या सात हुतात्मे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सध्याची जी तहसीलदार कार्यालय इमारत आहे त्या ठिकाणी १३ डिसेंबर १९४२ रोजी ब्रिटिश कचेरीवर साततरुण स्वातंत्र्यविरांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यामध्ये ब्रिटिश सैनिकांकडून प्रतिहल्ला झाल्यानंतर ह्या सात तरुण हुतात्मे झाले होते. याच इमारतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते धारातीर्थ पडले होते. अशा या ऐतिहासिक इमारतीला विकासाच्या कारणाने पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा घाट प्रशासन करत आहे. गेली वर्षभर वेळोवेळी मोर्चे, आंदोलने करुन निवेदने देऊन ही प्रशासन याची दखल घ्यायला तयार नाही म्हणून संविधानिक लोकशाही मार्गाने १२ जून ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत हे आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलन प्रसंगी बिद्री साखर कारखान्याचे संचालक राहुल देसाई, शिवसेना उप जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, कॉ. सम्राट मोरे, मच्छिंद्र मुगडे, कॉ. राम कळम्बेकर, शंभूराजे वारके, सौ. के. एस. देसाई, डॉ. राजीव चव्हाण, राजेंद्र यादव, कृष्णा भारतीय, धनराज चव्हाण, मानसिंग देसाई, मायकल डिसुजा, स्वप्निल साळोखे यासह हुतात्म्यांचे वारसदार, कार्यकर्ते उपस्थित होते.

