नृसिंहवाडी / प्रतिनिधी
येथे गेल्या अनेक महिन्यांपासून लो होल्टेज प्रॉब्लेम सुरू झाला होता. याबाबत नागरिकांच्या तक्रारी होऊनदेखील महावितरणने याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. अखेर दोन दिवसांपूर्वी याबाबतचे सविस्तर वृत्त दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन गावातील विद्युत केबल बदलण्याचे काम महावितरणने तातडीने सुरू केले आहे.
लो होल्टेजच्या प्रॉब्लेममुळे येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्याचबरोबर अनेक नागरिकांची विद्युत उपकरणे निकामी झाली. ग्रामपंचायतीची पाणी उपसा विद्युत मोटारही जळाली होती. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबतचा प्रस्ताव पाठवणार आहे. मात्र, बजेट मंजूर नसल्याचे सांगण्यात आले होते. अखेर याबाबतची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्युत वितरण कंपनीने तातडीने गावातील लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम लक्षात घेऊन विद्युत केबल बदलण्याचे काम हाती घेतले आहे.गावातील मुख्य विद्युत पोलवरील सर्व मुख्य विद्युत केबल बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी कार्यरत असून, नागरिकांच्या मागणीनंतर तातडीने काम सुरू केल्याबद्दल महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांचा व अधिकाऱ्यांचे गावकऱ्यांकडून काही प्रमाणात का होईना समाधान व्यक्त होत आहे. मागील कन्यागत महापर्व काळाच्या वेळी या केबल्स बदलण्यात आल्या होत्या. यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून याकडे महावितरणने दुर्लक्ष केले होते. लो होल्टेज प्रॉब्लेमचा नागरिकांना त्रास होत होता. अखेर याची दखल घेत विद्युत केबल बदलण्याचे काम सुरू केले आहे.

