फुलेवाडी ते बालिंगा रस्त्यावर खांडसरी परिसरात ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने महिलेचा चिरडून मृत्यू झाला. विद्या सिद्धार्थ कांबळे (वय 53, रा. गजानन महाराज कॉलनी, खांडसरी परिसर, मूळ रा. यवलूज, ता. पन्हाळा) असे या महिलेचे नाव आहे
बालिंगा ते खांडसरी रस्त्यावरून सिद्धार्थ कांबळे हे पत्नीसह दुचाकीवरून कोल्हापूरकडे जात होते. त्यांच्या दुचाकीच्या पुढे मालवाहू टेम्पो होता. त्या टेम्पोला ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असणार्या ट्रकचालकाने कांबळे यांच्या दुचाकीला धडक दिल्यामुळे त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले तर त्यांची पत्नी विद्या या ट्रकच्या मागील चाकात सापडल्याने चिरडल्या गेल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. करवीरचे सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे तसेच पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे यांनी अपघातस्थळी भेट देऊन ट्रक चालकाला अटक केली.
ट्रकखाली सापडून विद्या कांबळे यांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकेवर दगडफेक करून संताप व्यक्त केला. या दगडफेकीत ट्रकच्या काचा फुटल्या.

