आत्मसंरक्षण हा गुण जोपासलाच पाहिजे-साळवे

इचलकरंजी / प्रतिनिधी

कराटेया क्रीडा प्रकारातून मुलांची शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढून ते सदृढ बनतात. आत्मसंरक्षण हा भारतीय संस्कृतीचा गुण आहे. तो जोपासलाच पाहिजे. यासाठी येथील अमॅच्युअर तायक्वाँदो अॅकॅडमीने चालवलेली प्रशिक्षणाची सुविधा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी केले.
येथील अमॅच्युअर तायक्वाँदो अॅकॅडमीच्या वतीने ‘ब्लॅक बेल्ट पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा’ पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. साळवे बोलत होते. अध्यक्षस्थानी इचलकरंजी पॉवरलुम कापड मार्केट हौसिंग सोसायटीचे चेअरमन सर्वेश्वर भांगडिया होते. अकॅडमीचे संस्थापक ग्रॅण्डमास्टर रविकिरण चौगुले यांनी स्वागत केले. यानंतर खेळाडू मुला-मुलींनी मार्शल आर्टची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
वसंत चवानम समीरसिंह साळवे यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट विजेते खेळाडू वैभवी तोष्णीवाल, श्रीशा शिरगावे, जॉयलीन अंद्रादे, अद्विता पुजारी, रुद्र हासबे, अनीस सय्यद, प्रतिक्षा टेकाळे, ऐश्वर्या पताडे यांना प्रमाणपत्रे तर सर्वेश्वर भांगडीया यांच्या हस्ते सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. कापड मार्केट सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रप्रकाश छाजेड यांच्या हस्ते वयाच्या आठव्या वर्षी ब्लॅक बेल्ट मिळविण्याचा विक्रम करणाऱ्या मंजुनाथ बिरादर आणि महेश केसवानी याना सन्मानचिन्ह देण्यात आले. मारवाडी युवा मंच (मिडटाऊन) च्या अध्यक्षा अनिता जैन यांच्या हस्ते अन्य प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. मान्यवर पाहण्यांनी मुला-मुलींच्या कला गुणांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले. पालक प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर बिरादार आणि अॅड. नमिता शिरगावे यांनी मनोगत व्यक्त केले. रामचंद्र ठिकणे यांनी सूत्रसंचलन केले. सिनियर ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका सौ. किरण चौगुले यांनी आभार मानले.
कार्यक्रमास ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक महेंद्र शिंदे, रोहित सुतार, रिया चौगुले, श्रेया चौगुले, श्रेया केसवानी, विवेक अग्रवाल, प्राजू बिरादार आदी ब्लॅक बेल्टधारकांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top