
जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर वाढला. नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून पंचगंगेची पातळी दिवसभरात अवघ्या 13 तासांत नऊ फुटांनी वाढली. पाणी पातळीचा वेग असाच कायम राहिल्यास मंगळवारी पंचगंगा पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रासह दोन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. पंचगंगेवरील राजाराम आणि शिंगणापूर बंधारा यंदा दुसर्यांदा पाण्याखाली गेला. यासह पाण्याखाली गेलेल्या बंधार्यांची संख्या 16 वर गेली. चौके (ता. राधानगरी) येथील ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली. करुळ घाटात दरड कोसळल्याने दिवसभर वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.
रविवारी रात्रभर सुरू असलेल्या पावसाची सोमवारी पहाटेपासून संंततधार सुरूच होती. जिल्ह्यातील बहुतांशी सर्वत्र दिवसभर दमदार पाऊस सुरू होता. शहर आणि परिसरात विश्रांती घेत पावसाची बॅटिंग सुरूच होती. शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने पंचगंगेच्या पातळीत वेगाने वाढ होत गेली. सोमवारी सकाळी आठ वाजता पाणी पातळी 13.11 फुटावर होती. दुपारी चार वाजता ती 20.5 फुटावर गेली. त्यानंतरही त्यात सतत वाढ सुरूच आहे. रात्री नऊ वाजता ती 22.10 फुटावर गेली होती. गेल्या 13 तासात पाणी पातळीत नऊ फुटांनी वाढ झाली. पंचगंगेचे पाणी रात्री पंचगंगा घाटावरील मारुतीच्या मंदिराजवळ आले होते.
पंचगंगेच्या पातळीत वाढ होत राहिल्याने सकाळीच राजाराम बंधारा आणि दुपारी शिंगणापूर बंधारा दुसर्यांदा पाण्याखाली गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली असून ती सध्या पर्यायी मार्गाने सुरू आहे. यासह पंचगंगा नदीवरील रुई, इचलकरंजी असे एकूण चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कुंभी नदीवरील सांगशी बंधार्यावरही पाणी आले. कासाारी नदीवरील सात बंधारे पाण्याखाली गेले. वाळोली, यवलूज, पुनाळ, तिरपण, बर्की, ठाणे आणि आळवे बंधार्यावर पाणी आल्याने त्यावरील वाहतूक बंद झाली. भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे आणि शिरगाव हे तीन बंधारे तस आजरा तालुक्यातील साळगाव बंधार्यावर पाणी आल्याने एकूण 16 बंधारे पाण्याखाली गेले
जिल्ह्यात सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 51.4 मि.मी. इतक्या दमदार पावसाची नोंद झाली. गगनबावडा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. गगनबावड्यात 135.7 मि.मी. तर चंदगडमध्ये 74.6 मि.मी. पाऊस झाला. आजर्यात 60.2, भुदरगडमध्ये 63, कागलमध्ये 64.3, करवीरमध्ये 41.5, राधानगरीत 61.4, शाहूवाडीत 51.6, शिरोळमध्ये 19.5 तर हातकणंगलेत 30.3 मि.मी.पाऊस झाला.
जिल्ह्यातील प्रमुख 17 पैकी वारणा (52 मि.मी.) धरण परिसर वगळता उर्वरित 16 धरणक्षेत्रात गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झाली. घटप्रभा धरण परिसरात 225 मि.मी. तर कुंभी परिसरात 203 मि.मी. इतका पाऊस झाला. जांबरे परिसरात 190 मि.मी. तर राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 172मि.मी., तुळशी परिसरात 124 मि.मी. तर दुधगंगा परिसरात 120 मि.मी. पाऊस झाला.
करूळ घाटात दरड कोसळली. यामुळे दिवसभर कोकणात जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. दरड हटवल्यानंतर सायंकाळी पाच वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. चौके (ता. राधानगरी) येथे ओढ्यावरील पूल वाहून गेला. यामुळे गावात जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली. या ठिकाणी असलेल्या एका लोखंडी पुलावरून चालत ये-जा करावी लागणार आहे.
