पूरग्रस्तवासियांना उणीव भासू देणार नाही.

इचलकरंजी / प्रतिनिधी

संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूर क्षेत्रातील नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि महानगरपालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत पूरग्रस्त शहरवासियांना कोणतीही उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिली.
सन २०१९ आणि सन २०२१ सालात इचलकरंजी शहरात पंचगंगा नदीस आलेल्या महापुराची पार्श्वभूमी विचारात घेऊन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी महानगरपालिका प्रशासन, जागतिक बँक प्रतिनिधी, पूर बाधित क्षेत्रातील नागरिक, महापुराच्या कालावधीत महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करत असलेल्या सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था, पूर क्षेत्रातील स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत आयुक्त पाटील यांनी सर्वप्रथम स्थानिक लोकप्रतिनिधी, पूरक्षेत्रातील नागरिक आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी पूर परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी समस्या जाणून घेतल्या.
या अनुषंगाने माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले, माजी नगरसेवक संजय जाधव, पापालाल मुजावर, उल्हास लेले, प्रमोद बचाटे, सरदार मुल्ला, जीवन मुक्ती संघटनेचे अनिल घोडके आदींनी पूर परिस्थिती मध्ये निर्माण होणाऱ्या समस्या तसेच याकामी महानगरपालिका प्रशासनाकडून पुरविण्यात येत असलेल्या सुविधा इत्यादीची माहिती दिली.
पूर परिस्थिती बाबतची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर, महानगरपालिका अधिकारी यांच्यासह सोमवारी ५ मे रोजी संपूर्ण पूर क्षेत्राची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. तसेच संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेली कामे यामध्ये प्रामुख्याने शहरातील सर्व सारण गटारींची स्वच्छता करणे, काळा ओढ्याची जे.सी.बी. च्या सहाय्याने स्वच्छता करणे, सर्पमित्र, प्राणी मित्र यांना आवश्यक असणारी उपकरणे पुरविणे, शहरातील धोकादायक ठरणारी झाडे तोडणे, पूरग्रस्त छावणीमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत का याची खातर जमा करण्याचे आदेश तातडीने संबंधित विभाग प्रमुख यांना देवून शहरातील पूरग्रस्तांना कोणतीही उणीव भासू देणार नाही अशी ग्वाही आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिली.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, सहा. आयुक्त रोशनी गोडे, सहा. आयुक्त विजय राजापुरे, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुनीलदत्त संगेवार, कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, अभियंता बाजी कांबळे, मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील, नितीन बनगे आदी उपस्थित होते.

Scroll to Top