तालुक्यात रब्बी हंगाम व ऊस हंगाम संपत आले आहेत. दरम्यान, आता मोकळ्या झालेल्या शेतजमिनीच्या मशागतीची लगबग सुरू झाली आहे. जमिनीची नांगरट, फणनी करणे, शेणखत व जैविक खतांची मात्रा टाकण्याचे काम सध्या युद्धपातळीवर शेतकर्यांनी सुरू केले आहे. याचवेळी यावर्षी पाऊस कसा राहणार, याकडेही शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
तालुक्याचे एकूण 58 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी पिकावू क्षेत्र जवळपास 50 हजार हेक्टर आहे. तालुक्यात शेतकर्यांना वरदान ठरणार्या टेंभू आणि ताकारी या दोन सिंचन योजनांचे पाणी खेळू लागले आहे. त्यामुळे तालुक्यात शाश्वत ऊस पिकाचे मोठे क्षेत्र आहे. तालुक्यात जवळपास 20 ते 25 हजार हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक घेतले जाते, तर सुमारे 22 हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी होते. सध्या तीव्र उन्हाचा मार्च संपत आला आहे, तर एप्रिल, मे व जून हे तीव्र उन्हाचे महिने बाकी आहेत. तालुक्यात मागीलवर्षी पर्जन्यमान मोठ्या प्रमाणात झाले. तसेच तालुक्यातील टेंभू, ताकारी या सिंचन योजनांमुळे सध्या तरी टंचाईवर मात करण्यात आली आहे. त्यामुळे शेती मशागती कामांना गती मिळाली आहे. पुढे जून व जुलै महिन्यात पावसाची सुरुवात झाल्यास शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. तालुक्यात खरीप हंगामासाठी व आडसाली ऊस पिकाच्या लागणीसाठी जोरदार शेती मशागतीची कामे आतापासूनच सुरू झाली आहेत. शेतकरी मोठ्या ट्रॅक्टरने आपल्या शेतीची नांगरट करत आहे. याचबरोबर शेणखत, पोल्ट्रीखत व सेंद्रिय खतांची मात्रा जमिनीत देत असल्याचे चित्र दिसत आहे.
रब्बी आणि ऊस तोडणी हंगाम संपल्याने शेतजमिनी रिकाम्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात पाण्याचा स्रोत उपलब्ध करण्यासाठी नवीन विहीर खोदाई, जुन्या विहिरीची डागडुजी करणे, पाईपलाईन करणे आदी कामांना गती देत आहे. शेतकरी शेतीकामाच्या धांदलीत व्यस्त आहे.

