अटीतटीच्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाचे कडवे आवाहन फोल ठरवत संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल क्लबने त्यांचा 3 विरुद्ध 1 अशा गोलफरकाने पराभव करून गत स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील उट्टे काढत अटल चषक 2025 स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. विजेत्या जुना बुधवार संघाला 1 लाख व मानाचा अटल चषक आणि उपविजेत्या खंडोबा तालीम मंडळाला 75 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ भारतीय जनता पार्टी व तटाकडील तालीम मंडळ यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हजारो फुटबॉल शौकिनांच्या उपस्थितीत रविवारी स्पर्धेतील अंतिम सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधावर पेठ यांच्यात रंगला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच जुना बुधवार संघाने आक्रमक पवित्रा घेत खोलवर चढायांचा लवलंब केला. सामन्याच्या 5 व्या मिनिटालाच त्यांच्या रविराज भोसलेने गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 17 व्या मिनिटाला जुना बुधवारकडून झालेल्या दुसर्या चढाईत सनवीर सिंगने गोल नोंदवून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ 23 व्या मिनिटाला रिंकू सेठ याने तिसरा गोल नोंदवून संघाची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. तीन गोलने पिछाडीवर असणार्या खंडोबाकडून आघाडीसाठी प्रयत्न सुरूच होते. 43 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत रोहण आडनाईकने हेडद्वारे गोल नोंदवून मध्यंतरापर्यंत सामना 3-1 असा केला.
उत्तरार्धातही खंडोबाकडून गोलची परतफेड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच होते. मात्र, जुना बुधवारचा भक्कम बचाव आणि गोलरक्षक शुभम घराळेची विशेष कामगिरी यामुळे उर्वरित गोलची परतफेड त्यांना करता आली नाही. दरम्यान, जुना बुधवार पेठच्या संकेत जरग याने नियमबाह्य पद्धतीने हॅण्डबॉल केल्याने पंचांनी त्याला यलो कार्ड दाखविले. दुहेरी यलो कार्डमुळे त्याच्यावर रेड कार्डची कारवाई होऊन सामना सोडावा लागला.
सामना संपताच साऊंड सिस्टीमच्या दणदणाटात जुना बुधवारच्या समर्थकांनी एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांच्या आतषबाजीत बक्षीस समारंभ झाला. खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर, भाजपचे राज्य सचिव महेश जाधव, उद्योजक तुषार काळे, माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अभिराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, कोमल देसाई, संस्कृती देसाई, आप्पा लाड, शैलेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस समारंभ झाला. संयोजन अशोक देसाई, गणेश देसाई, तटाकडील तालीम मंडळाचे राजेंद्र तथा एन. डी. जाधव, शहाजी शिंदे, अथर्व गायकवाड, रोहित माने, विश्वदीप साळोखे व सहकार्यांनी केले. विजय साळोखे यांनी निवेदन केले.
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) ने आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यास पुढील हंगामातील अटल चषक स्पर्धेपूर्वी छत्रपती शाहू स्टेडियमवरील प्रेक्षक गॅलरीवर छत बसविण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ग्वाही दिल्याची माहिती महेश जाधव यांनी दिली. याला दुजोरा देत खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र व राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून विशेष योजनेतून हे काम मार्गी लावले जाईल, असे आश्वासन दिले, तर आ. राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या फुटबॉल विकासासाठी सर्वोतोपरी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली.
सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी प्रचंड हुल्लडबाजी केली. प्रेक्षक गॅलरीत फटाके लावणे, अश्लील घोषणाबाजी व शिवीगाळ असे प्रकार वारंवार केले. सामना जिंकल्यावरही अनेक समर्थकांनी धोकादायक रीत्या प्रेक्षक गॅलरीतून उड्या घेत मैदानात प्रवेश केला. संयोजकांनी वारंवार सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. नेहमीप्रमाणे हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलिसांना प्रेक्षक गॅलरीत धावावे लागले.
विजेता : संयुक्त जुना बुधावर पेठ फुटबॉल क्लब – 1 लाख रुपये व अटल चषक.
उपविजेता : खंडोबा तालीम मंडळ – 75 हजार रुपये व चषक.
सामनावीर : शुभम घराळे (जुना बुधवार),
लढवय्या : कुणाल दळवी (खंडोबा तालीम)

