कोल्हापूर / प्रतिनिधी
फुटबॉल हंगाम सन २०२४-२५ करिता संघ व खेळाडू नोंदणी प्रक्रियेस आजपासून (दि. ५) प्रारंभ होणार आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवरील कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) कार्यालयात ११ डिसेंबर अखेर दररोज सायंकाळी ५ ते ७ यावेळेत वरिष्ठ गटासाठीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
दरम्यान, वरिष्ठ गटातील प्रचंड ईर्षेतून प्रतिस्पर्धी संघातील स्टार खेळाडूंना विविध प्रकारच्या ऑफर्स देऊन आपल्या संघाकडून रजिस्ट्रेशन करण्याची चढाओढ सुरूच आहे. यामुळे आगामी हंगामासाठी कोण फुटबॉलपटू कोणत्या फुटबॉल संघाकडून रजिस्ट्रेशन करतो याची प्रचंड उत्सुकता फुटबॉलप्रेमींना लागून राहिल्याने याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. इतकेच नव्हे, तर नेहमीप्रमाणेच सोशल मीडियावर ईर्षा निर्माण करणाऱ्या पोस्टस् बिनधास्त व्हायरल केल्या जात आहेत. यंदाच्या हंगामासाठी संघ व खेळाडू नोंदणी नियमित पद्धतीने दिनांक ५ ते ९ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर विलंबाने होणारी नोंदणी दि. १० व ११ डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ५ ते ७ यावेळेत सुरू राहणार आहे. केवळ दि. ११ डिसेंबरला नोंदणीची वेळ सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत असणार आहे.