एस.टी.च्या मागील चाकाखाली सापडून दुचाकीस्वार विजयकुमार बाळासो चौगुले (वय 60, रा. यड्राव) हे जागीच ठार झाले. ते शिक्षक होते. हा अपघात सांगली रोडवरील हॉटेल राज कॅसलसमोर सकाळी आठ वाजता झाला. या अपघाताची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.
याप्रकरणी राजश्री विजयकुमार चौगुले (55) यांनी फिर्याद दिली असून, एस.टी.चालक पुंडलिक सदाशिव कुंभार (47, रा. कुंभारवाडा, बोरवडे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शनिवारी सकाळी सांगली रोडवरून इचलकरंजीच्या दिशेने एस.टी. (एम.एच. 07 सी 9197) येत होती. त्याचवेळी विजयकुमार चौगुले हे दुचाकी (एम.एच. 09 ई 8302) वरून त्याच मार्गाने येत होते. एस.टी.ला ओव्हरटेक करून पुढे जात असताना अचानकपणे त्यांची दुचाकी अडखळली आणि ते रस्त्यावर पडले. त्याचवेळी तेथून निघालेल्या एस.टी.चे मागील चाक चौगुले त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलिसांना घटनास्थळी त्वरित धाव घेत पंचनामा केला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी गर्दी केली होती. या अपघाताची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.

