टाकवडे\ प्रतिनिधी
टाकवडे (ता. शिरोळ) येथे स्वीट आणि नमकीन कारखान्याला लागलेल्या आगीत कारखाना जळून खाक झाला. मशिनरीसह, कच्चा, पक्का माल जळाला असून इमारतीवरचे छतही जळाले आहे. या आगीत सुमारे ४० ते ५० लाखांचे नुकसान झाले आहे. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. आगीमुळे सिलिंडर पेट घेतल्याने सिलेंडरचा स्फोट अर्धा किलोमीटरपर्यंत आवाज गेला होता. या आवाजानेच आगीची घटना समजली. इचलकरंजी, कुरुंदवाड, दत्त साखर कारखान्याच्या पाच अग्निशमन दलाने सुमारे दोन तासांनी आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटनेच आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आग विझविताना कारखाना कामगार अर्जुन चव्हाण किरकोळ जखमी झाला आहे.
येथील रवींद्र विनायक पोळ यांचा जांभळी-टाकवडे रस्त्यावर आनंदी स्वीट आणि नमकीन कारखाना आहे. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास कारखान्याला अचानक आग लागली. आगीमुळे सिलिंडर पेट घेऊन त्याचा स्फोट झाला. स्फोटाने कारखान्याच्या काचा, इमारतीवरील पत्रे फुटून गेले आहेत. शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे.