कोल्हापूर– “एम.एस्सी. शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्यांना पुढे संशोधनात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक दृष्टीकोन विकसित करायला हवा,” असे प्रतिपादन जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले. रसायनशास्त्र विभागामार्फत एम.एस्सी. भाग-१ च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्वागत समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, सौ. दिपाली पाटील, डॉ. संदीप वाटेगावकर यांची उपस्थिती होती.
डॉ. फगरे पुढे म्हणाले, “संशोधनाची आवड जोपासून ती प्रत्यक्ष कृतीत उतरविणे हेच खरे शैक्षणिक प्रगतीचे लक्षण आहे. आज रसायनशास्त्र विषयाला जागतिक स्तरावर प्रचंड मागणी असून, फार्मास्युटिकल्स, केमिकल इंडस्ट्री, पर्यावरण संवर्धन, ऊर्जा निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये अमर्याद संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि नाविन्यपूर्ण विचारसरणी यांचा संगम साधणे आवश्यक आहे.”
उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण हा केवळ नोकरी मिळविण्याचा मार्ग आहे असे समजू नये. ज्ञानाचे खरे सार आत्मसात करून ते समाजाच्या प्रगतीसाठी उपयोगात आणणे हीच खरी शिक्षणाची पूर्तता आहे. रसायनशास्त्राच्या क्षेत्रात प्रचंड संधी असून विद्यार्थ्यांनी त्या संधींचा लाभ घेण्यासाठी स्वतःची कौशल्ये विकसित केली पाहिजेत.”
अध्यक्षीय भाषणात प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आव्हानांना कधीही घाबरून न जाता त्यांना संधी म्हणून स्वीकारावे. प्रत्येक अडचणीत यशस्वी होण्याची बीजं दडलेली असतात. संशोधन ही केवळ शास्त्रज्ञांची जबाबदारी नसून प्रत्येक विद्यार्थ्याने नाविन्यपूर्ण विचार करून समाजातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घ्यायला बाहेर जायला लागू नये म्हणून जनता शिक्षण संस्थेने एमएस्सी रसायनशास्त्र हा अभ्यासक्रम सुरू केला. या विभागाने आतापर्यंत अनेक उल्लेखनीय कामगिरी केली असून भविष्यात हा विभाग संशोधन आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करेल, असा मला विश्वास आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. संदीप वाटेगावकर व सौ. दिपाली पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना प्रेरीत केले. तसेच एम.एस्सी. भाग-१ च्या विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृगेंद्र गुरव यांनी केले. प्रियांका ढेरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन प्रतीक्षा जाधव यांनी केले तर आभार शैलेंशा कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम.एस्सी. भाग-२ च्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.यावेळी राजेश्वरी कामटे, प्रियांका जाधव, पूजा जायगुडे, ऋतुजा भोईटे, निकिता सुर्वे, सोमनाथ सानप, अजित पांढरे, धनश्री शिर्के, मयुरी सावंत तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अनिल सावंत,चेतन तावरे, शिवम सूर्यवंशी आणि सचिन इथापे उपस्थित होते.कार्यक्रमाला एम.एस्सी. भाग-१ व भाग-२ चे सर्व विद्यार्थी, विभागातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
