कोल्हापूर: सध्याचं युग झपाट्याने बदलत असून, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला सज्ज राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन इन्स्टा व्हिजन लॅबोरेटरीचे संचालक डॉ. अजित एकल यांनी व्यक्त केले.
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित “अॅडव्हान्सड अनालायटिकल टेक्निक्स” या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. या प्रसंगी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, सौ. दीपाली पाटील, डॉ. संदीप वाटेगावकर व आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. एकल पुढे म्हणाले, “रसायनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांसाठी केमिकल व फार्मा उद्योगांमध्ये करिअरच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी प्राप्त ज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर केला तर त्यांना केवळ नोकरीच्या संधीच नव्हे, तर उद्योगधंदा सुरू करण्यासही मोठी मदत होऊ शकते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये जाऊन अनुभव घेणे अनिवार्य आहे. मुलाखतीचे तंत्र, प्रभावी संवाद कौशल्य, आणि आत्मविश्वास हे घटक करिअर घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची मानसिकता, नव्या गोष्टी शिकण्याची तयारी आणि लवचिकता हेच यशाचे रहस्य आहे.”
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाचे सखोल ज्ञान घेतले पाहिजे आणि ते व्यावहारिक जीवनात वापरले पाहिजे. रसायनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक वाटा खुल्या आहेत. प्राप्त ज्ञानाला कौशल्याची जोड दिली तर विद्यार्थी रोजगारक्षम व उद्योजक बनू शकतो.
प्रा. (डॉ.) झांबरे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात लागणाऱ्या कौशल्यावर भर दिला व अशा कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कशा प्रकारे महत्त्वाच्या आहेत याचे महत्व अधोरेखित केले. डॉ. वाटेगावकर यांनी ऑन जॉब ट्रेनिंग बद्दल माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना ट्रेनिंगमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ते यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
पाहुण्यांची ओळख राजेश्वरी कामटे यांनी करून दिली. सूत्रसंचालन पूजा जायगुडे आणि धनश्री शिर्के यांनी केले तर सोमनाथ सानप यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यशाळा समन्वयक सौ.दीपाली पाटील आणि डॉ. संदीप वाटेगावकर, प्रियांका जाधव, ऋतुजा भोईटे, निकिता सुर्वे, अजित पांढरे, मयुरी सावंत तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अनिल सावंत, अनिल लाखे, अनिल बोडरे, चेतन तावरे, शुभम पिसाळ, शिवम सूर्यवंशी, नवनाथ ठोंबरे आणि सचिन इथापे यांनी परिश्रम घेतले.
