‘शक्तिपीठ’ विरोधात बुधवारी विधानभवनावर धडक

कोल्हापूर / प्रतिनिधी

शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तिपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही, असा एल्गार पुकारत बुधवारी (दि. १२) मुंबईत विधानभवनावर १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली.
आझाद मैदानात सकाळी ९ वाजता काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा सुरू होईल. राज्यातून दहा हजारांहून अधिक शेतकरी तर कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत.
शक्तिपीठ महामार्गाला आमदारांचे समर्थन आहे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आमदारांचे समर्थन आहे, हे एकदा जाहीर करावे, असे आव्हान शक्तिपीठविरोधी संघर्ष समितीने दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, वर्षभरापासून त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना महामार्ग नको, तर पाणी हवे आहे. सरकार मात्र उद्योगपतींचे खिसे भरण्यासाठी या महामार्गाचा घाट घालत असल्याचा आरोप केला.

Scroll to Top