
संग्रहित छायाचित्र
सीपीआर रुग्णालयात सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाच्या डोक्यात दगड पडला. यात आणूर (ता. कागल) येथील विकास कांबळे हे गंभीर जखमी झाले. गुरुवारी दुपारी त्यांच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी सीपीआरमध्ये ते आले होते. तेव्हा हा प्रकार घडला.
कांबळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना तत्काळ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान साईनाथ सूर्यवंशी यांनी प्रसंगावधान राखत रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने सीपीआरच्या अपघात विभागात दाखल केले. सीपीआर येथील मोठमोठ्या इमारतींच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. ठेकेदारांनी कोणतीही सुरक्षा व्यवस्था ठेवलेली नाही. काम सुरू असताना इमारतींना आवश्यक ती संरक्षण जाळी बसवली नाही. त्यामुळे रुग्णालयात येणार्या शेकडो रुग्ण, नातेवाईक, तसेच रुग्णालय कर्मचार्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही इमारतीच्या दुरुस्तीवेळी कामाच्या ठिकाणी सुरक्षितता निश्चित करणे गरजेचे असते. याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे.
रुग्णालयात नियमित शेकडो रुग्णांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सीपीआर परिसरातील बांधकामांवर सुरक्षा जाळ्या बसवण्याची आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी रुग्णांसह नातेवाईकांतून होत आहे.
