कुरुंदवाड / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने साधना मंडळ कुरुंदवाडतर्फे आयोजित निमंत्रित ३० किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला. स्पर्धा शुभारंभाच्या सामन्यात एस. पी स्पोर्टस् इंदापूर-पळसंदे आणि सिद्धेश्वर स्पोर्टस्-आरवडे यांनी विजयी सलामी दिली.
येथील तबक उद्यान येथे साथी सुरेंद्र आलासे क्रीडानगरीत दिमाखात सुरू झालेल्या ३० किलो कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी साथीदार सुरेंद्र आलासे यांच्या प्रतिमेला गुरूदत्त शुगर टाकळीवाडीचे व्यवस्थापकीय संचालक राहुल घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी साधना मंडळाचे अध्यक्ष स. ग. सुभेदार होते. माजी नगराध्यक्ष वैभव उगळे, महावीर पोमाजे, भूपाल दिवटे, अँड देवराज मगदूम, जयपाल आलासे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्पर्धेचे पंच म्हणून अमर नवाळे, राजू प्रधाने, कपिल कांबळे, मोहसीन मोमीन, संजय खोत, रणजित कोळेकर, सूरज जाधव, इरगोंड बंडगर, शकील कोठीवाले तर स्पर्धेचे निवेदन श्रीकांत चव्हाण, अर्जुन पाटील हे करत आहेत.

