कोल्हापूर / प्रतिनिधी
शिवनेरी स्पोर्टस् व पोलाईट स्पोर्टस् संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आमदार चषक टी-२० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामीसह आघाडी मिळविली. आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशन व शांद फाऊंडेशन आयोजित या स्पर्धेस सोमवारी शाहूपुरी जिमखाना मैदानावर प्रारंभ झाला.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रिकेट असो. माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष आनंद माने यांच्या हस्ते झाले. यावेळी पंच शिवाजी कमते, प्रसाद मिराशी, मधू बामणे, राजाराम कुलकर्णी, अनिल शिंदे, संग्राम पाटील, चंदू धामणे, अजित शिंदे, रणजित इंदुरकर व प्रकाश माजगावकर आदी उपस्थित होते.
पहिला सामन्यात शिवनेरी स्पोर्टस्ने शाहूपुरी स्पोर्टस्चा ५४ धावांनी पराभव केला. शिवनेरी संघाने २० षटकांत १५३ धावा केल्या. उत्तरादाखल शाहूपुरी स्पोर्टस्चा संघ ९९ धावांत गुंडळला. सामनावीर म्हणून प्रथमेश बाजारीला गौरविण्यात आले. दुसऱ्या सामन्यात सांगलीच्या पोलाईट क्लबने कोल्हापूरच्या फायटर्स स्पोर्ट्सचा ५६ धावांनी पराभव केला. पोलाइट संघाने २० शतकात सात बाद १९१ धावा केल्या. उत्तरादाखल फायटर संघ १३५ धावांपर्यंत मजल मारु शकला. सामनावीर म्हणून स्वप्निल नाईकला गौरविण्यात आले.
