इचलकरंजी/ प्रतिनिधी
औद्योगिक प्रगती आणि झपाट्याचे आर्थिक परिवर्तन हे भांडवलदारीच्या दृष्टीने फार चांगले आहे.
अशा पद्धतीचे विचार महाराष्ट्र इंटकचे उपाध्यक्ष शामराव कुलकर्णी यांनी टेक्स्टाईल प्रोसेसिंग कामगारांच्या सुरक्षा सप्ताहा दिनानिमित्त बोलताना काढले. यावेळी अध्यक्षस्थानी स्वदेशीचे मॅनेजर राधेशाम शर्मा हे होते. सुरुवातीला सुरक्षा सप्ताहाची शपथ घेवून या सप्ताहामागे कारणांची मिमांसा आणि कामगारांनी सुद्धा कसे सुरक्षित राहिले पाहिजे याची माहिती राधेशामजी यांनी दिली.
यानंतर बोलताना शामराव कुलकर्णी यांनी सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने अनेक गोष्टी आपल्याला शिकता येण्यासारख्या आहेत. फॅक्टरीमध्ये खाली पडलेले तेल हे तातडीने पुसणे हे महत्वाचे आहे, त्याच्यावरुन एखाद्याचा पाय घसरला तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या साध्या गोष्टी आहेत, विजेची उपकरणे हाताळताना रबरी सॉक्स घालणे किंवा जे साधन दिले असेल त्याचा उपयोग करुन घेणे हे महत्वाचे आहे. शांततेने डाव्या बाजूने येणे हे सुरक्षिततेचे नियम आहे, असेही शामराव कुलकर्णी यांनी सांगितले.
कांडीवाल्या महिलांच्या बाबतीत किती अपघात होतात याला हिशोब नाही. मशिनमध्ये पदर अडकणे हे कायमचे आहे. हा पदर अडकला की मृत्यू हा ठरलेला आहे. याऐवजी अॅपरन घालणे, सावध राहणे, पट्यावर कुडण घालणे या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपल्या जीवनासाठी हे आपल्याला समजले पाहिजे, यासाठी सुरक्षा सप्ताह आहे. सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमाने संपूर्ण वर्षभर आपल्या कुटूंबाची जबाबदारी आपल्यावर आहे याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. यावेळी निरनिराळ्या कामगारांनी आपले अनुभव सांगितले. स्वदेशी प्रोसेसमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अनेक कामगार उपस्थित होते.
