शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारास शाहू सेनेकडून विरोध

शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार केल्यास त्याचा इंग्रजी भाषेत शॉर्टफॉर्म तयार होऊन मूळ नाव विस्मरणात जाण्याचा धोका आहे. त्यामुळे या नामविस्ताराला विरोध असल्याचे निवेदन शाहू सेनेकडून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ आपल्या शिवाजी विद्यापीठाचे नाव घेताना रयतेचा राजा ‘शिवाजी’ हा शब्द तोंडात रुळला आहे. विद्यापीठाच्या नावाचा नामविस्तार केल्यास त्याचा इंग्रजीत शॉर्टफॉर्म तयार होऊन मूळ नाव विस्मरणात जाण्याचा धोका आहे. सायबर (छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट), सीपीआर (छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय), सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), बाटू (डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी) याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीचा सीएसएम युनिव्हर्सिटीफ किंवा ‘सीएसएमयू’ असा शॉर्टफॉर्म तयार होऊ शकतो. त्यामुळे या नावात कोणताही बदल करण्यात येऊ नये. अशा प्रकारचा काही निर्णय घेण्याचा प्रयत्न झाल्यास कोल्हापूरकर त्याचा कडाडून विरोध करतील, असे शाहू सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी सांगितले.यावेळी अथर्व चौगले, रोनक पोवार, ऋतुराज पाटील, करण कवठेकर, प्रणव तुपे, अनुराग व्हसकोटी, शशिकांत सोनुले, आकाश बसुगडे, किशोर हावळ उपस्थित होते.

Scroll to Top