शेंडा पार्कमधील शाहूकालीन वास्तूला रविवारी मध्यरात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमवारी पहाटेपर्यंत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आगीमध्ये हेरिटेज असलेली शाहूकालीन वास्तू जळून खाक झाली. या दुर्घटनेमुळे आता तेथे केवळ भग्नावस्थेतील दगडी भिंती उरल्या आहेत. दरम्यान, गांजा ओढणार्या टोळक्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
या इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात गवत आहे. मध्यरात्री 3 च्या सुमारास गवताला आग लागली. बघता बघता आग पसरत गेली. त्यात शाहूकालीन इमारतीनेही पेट घेतला. त्यात वास्तू जळून खाक झाली. अग्निशमन दलाला नागरिकांनी वर्दी दिली. अग्निशमन दलाचे दोन फायर फायटर आणि एक मिनी फायर फायटर तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. फायरमन प्रवीण ब्रह्मदंडे, गिरीश गवळी, प्रमोद मोरे, विशाल चौगले, उमेश जगताप, संदीप व्हनाळकर, मोहसीन पठाण आदींनी सकाळी 7 पर्यंत सुमारे चार तास अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
दरम्यान, राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात या भव्य इमारतीला लागून असलेल्या खोल्या या घोड्यांच्या पागा म्हणून वापरल्या जात होत्या. राजाराम महाराज यांनी नंतर या इमारतीचा परिसर व त्याला लागून 500 एकर जमीन कुष्ठरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी दिली. त्याकाळचे सिव्हिल सर्जन डॉ. सीमेन्स यांच्या प्रयत्नाने कुष्ठरुग्णांना राहण्यासाठी टुमदार क्वार्टर्स बांधली. 250 ते 300 कुष्ठरुग्ण येथे राहत असत. त्याकाळी शेंडापार्क कुष्ठधाम ही नावाजलेली संस्था म्हणून नावारूपाला आली होती. 1965 च्या दरम्यान शेंडापार्क कडील 350 एकर जमीन कृषी महाविद्यालयाला दिली. मेडिकल कॉलेज, वाहनांचे सर्व्हिस सेंटर, कर्मचारी हौसिंग सोसायटी, चेतना विकास मंदिर अशा विविध कारणांसाठी जमिनी वाटून 90 एकर शिल्लक राहिली. यामध्येही आता प्रशासकीय इमारत, मेडिकल कॉलेजचे रुग्णालय यांच्या इमारती उभ्या राहत आहेत. 1965 च्या सुमारास शेंडा पार्क कुष्ठधाम हे कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे चालवायला दिले गेले. त्यानंतर शेंडापार्क कुष्ठाधामच्या वैभवाला उतरती कळा चालू झाली.
