कोल्हापूर/प्रतिनिधी
सोमवार पेठ परिसरातील ज्येष्ठ पत्रकार दिलावरखान ऊर्फ नाना आयुबखान मुन्शी पालकर (वय ७८) यांचे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मेंदूमध्ये रक्तस्राव झाला होता. उपचार सुरू असताना सोमवारी त्यांची रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मुन्शी पालकर हे पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत होते. १९८८ ते १९९० नवी दिल्ली येथे देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. ‘नानदास वटाणे’ या टोपण नावाने त्यांनी दै. ‘पुढारी’ मध्ये
वात्रटिका लेखन केले. १९९५ ते २००७ मध्ये त्यांनी तुलनात्मक वृत्त विश्लेषण व मुक्त पत्रकार म्हणून दै. ‘पुढारी’ मध्ये काम केले आहे. नवी दिल्ली येथे दै. ‘पुढारी’साठी व मुंबई प्रतिनिधी व विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.
त्यांचे स्वतःचे ‘तडजोड’ साप्ताहिक होते. याशिवाय दैनिक पुढारी, दैनिक नवाकाळ, साप्ताहिक, पोलिस टाईम्स अशा विविध वृत्तपत्रांत त्यांनी पत्रकारिता केली. पत्रकारितेमधील योगदानाबद्दल त्यांना अनेक संस्था, संघटनांच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. पत्रकारांच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रेस क्लब ऑफ इंडियाचे ते सदस्य होते. महाराष्ट्र राज्य अधिस्विकृती समितीचे त्यांनी विभागीय अध्यक्षपद भूषवले होते. इंग्लंड आणि अमेरिका येथे त्यांचे काही काळ वास्तव्य होते. याशिवाय जेदाह, मक्का, मदिना येथे धार्मिक पर्यटन त्यांनी केले आहे.