
नववी ते बारावीच्या (माध्यमिक व उच्च माध्यमिक) विद्यार्थ्यांसाठी राज्यात निवासी शाळा उभारण्यात येणार आहेत. ‘आनंद गुरुकुल’ (विशेष नैपुण्य) उभारण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. राज्यातील आठ विभागांत प्रत्येकी एक याप्रमाणे 200 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा उभारण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या वर्षांपासूनच या शाळा सुरू करण्याचाही विचार आहे.
इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी च्या नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच 21 व्या शतकाची गरज ओळखून क्रीडा, कला, शाखा व तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, संवाद कौशल्य, वित्तीय सेवा, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जागतिक पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास आदी विषयांच्या विशेष नैपुण्य शाखांचा अभ्यास शिकविण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. या विशेष नैपुण्य विषयांच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिल्यास त्यांना भविष्यात त्या-त्या क्षेत्रातील उच्च शिक्षणाची गोडी निर्माण होईल, त्यातून त्या विषयातील योगदान व देशात उच्च दर्जाचे मनुष्यबळ निर्माण करणे व शैक्षणिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण व शाश्वत विकास करणे शक्य होईल, अशी राज्य शासनाची धारणा आहे.
राज्यात 8 शैक्षणिक विभाग आहेत. यापैकी पाच शैक्षणिक विभागांतील धुळे, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, सातारा व अमरावती या पाच जिल्ह्यांत शासकीय विद्यानिकेतने सुरू आहेत. या व्यतिरिक्त अन्य तीन शैक्षणिक विभागांत शासकीय विद्यानिकेतनाप्रमाणेच सुविधा उपलब्ध असलेल्या व सध्या सुरू असलेल्या शाळांपैकी सुस्थितीत असलेल्या व विकासासाठी वाव असलेल्या सुयोग्य शाळांची निवड केली जाणार आहे.
‘आनंद गुरुकुल’ सुरू करण्यासाठी राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन केली आहे. समिती या शाळांचे स्थळ निश्चित करेल. उपसमिती शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विशेष नैपुण्य विषयांचा अभ्यासक्रम ठरवेल. प्रवेश पद्धती निश्चित करेल तसेच या शाळांची नियमित कार्यपद्धती, दिनदर्शिका ठरवेल.
