अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेचे सर्वेक्षण
वाई/ प्रतिनिधी
अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे व सहायक प्राध्यापक डॉ. संदीप वाटेगांवकर यांना जागतिक संशोधकांच्या क्रमवारीत अग्रस्थान मिळाले आहे. स्कॉलर जीपीएस या संस्थेने आजीवन व मागील ५ वर्षातील जागतिक संशोधकांची यादी प्रसिद्ध केली, यामध्ये जगभरातील नामवंत संशोधकांचा समावेश आहे. डॉ. झांबरे व डॉ.वाटेगांवकर यांच्या नावांच्या समावेशाने किसन वीर महाविद्यालयाला आंतरराष्ट्रीय बहुमान प्राप्त झाला आहे.
प्रा.(डॉ.) झांबरे यांना शिक्षण व संशोधन क्षेत्रात ३ दशकाहून अधिक अनुभव असून, त्यांनी आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये २० हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. रसायनशास्त्र विषयातील १०० हुन अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असतात. समाजातील विविध प्रश्न घेऊन विज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी ते नेहमीच कार्यरत असतात. ग्रामीण भागामध्ये विज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात कार्यरत असणारे डॉ.वाटेगावकर यांना संशोधनाची प्रचंड आवड आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये २५ हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब आहे. मटेरियल सायन्स क्षेत्रात त्यांनी केलेल्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असून त्यांना अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केले आहे. सध्या ते सौर ऊर्जा, सुपरकपॅसिटर, वॉटर स्प्लिटिंग, हैड्रोजन एनर्जी इ. विषयांवर पुढील संशोधन करीत आहेत.
महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग हा सर्व दृष्टीने समृद्ध असून या विभागात सध्या १३ प्राध्यापक कार्यरत आहेत. या विभागात पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. संशोधनाचे कार्य अविरतपणे चालत आहे. या विभागातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठस्तरावरील अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांनी महाविद्यालयात त्यांना सेवा करण्याची संधी दिली व विद्यमान अध्यक्ष माननीय मदनदादा भोसले यांनी सातत्याने संशोधनासाठी प्रोत्साहन दिल्याने डॉ.झांबरे व डॉ. वाटेगांवकर यांनी हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री.शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ. हणमंत कणसे, श्री.भीमराव पटकुरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.