कुरुंदवाड / प्रतिनिधी
राष्ट्रसेवा मंडळ, कुरुंदवाड यांच्यातर्फे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रित भव्य प्रो-कबड्डी स्पर्धेचा उत्साही समारोप झाला. तबक मैदानावर झालेल्या या स्पर्धेत पुरुष विभागात जे. डी. अॅकॅडमी-नोएडाने, तर महिला विभागात एम. डी. स्पोर्टस् पुणेने विजेतेपद पटकावले.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात जे. डी. अॅकॅडमी-नोएडाने शिवमुद्रा स्पोर्टस्-कौलवचा ३७ विरुद्ध ३५ अशा २ गुणांनी पराभव करत स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील चषकावर नाव कोरले. उपविजेतेपद शिवमुद्रा स्पोर्टस् कौलवने पटकावले, तर तृतीय क्रमांक मलथलाई-बंगळूर आणि एम. एस. स्पोर्टस्-जमखंडी या संघांनी विभागून घेतला. महिला विभागातील अंतिम लढतीत एम. डी. स्पोर्टस्-पुणेने डॉ. शिरोडकर स्पोर्टस्-मुंबईवर २४ विरुद्ध २१ अशा ३ गुणांनी विजय मिळवत स्व. आक्काताई जिनगोंडा पाटील चषकावर नाव कोरले. शिरोडकर स्पोर्टस्-मुंबईला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्वराज्य स्पोर्टस्-मुंबई आणि शिवशक्ती स्पोर्टस् मुंबई यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला. बक्षीस वितरण समारंभाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धैर्यशील माने, आ. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि डॉ. संजय पाटील यांनी उपस्थिती लावली. विजेत्या संघांना गणपतराव पाटील, गणपतराव सावगावे, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील व त्रिशला पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रा. अण्णासाहेब माने-गावडे यांनी स्पर्धेचे निरीक्षण केले. कार्यक्रमास डॉ. संजय पाटील, अॅड. सुशांत पाटील, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, जवाहर पाटील, अभिजित पाटील, महेश माळी, मोहन मोहिते, शरद आलासे उपस्थित होते.

