संस्कारी पिढी घडवण्यासाठी व्याख्यानमालांची गरज
बांगलादेश मधील घडलेली दुर्दैवी घटना, शालेय मुलीवर झालेला अमानुष लैंगिक अत्याचार अशा अनेक विकृत घटना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत रोजच घडत आहेत. घटना घडली की त्या घटनेचा निषेध, व्हाट्सअप वरती स्टेटस, इंस्टाग्रामवरती स्टोरी , फेसबुक वरती रील, सरकार दरबारी निवेदन, कॅन्डल मार्च, टीव्ही वरती ब्रेकिंग न्यूज, वृत्तपत्रातील हेडलाईन, रास्ता रोको आणि बंदची हाक.हे वर्षानुवर्षे असंच घडतंय. घटना घडवून गेली की चार दिवस सर्वजण याच गोष्टी करतात. पुन्हा पुन्हा चर्चा होते स्त्रीच्या सुरक्षिततेची. चार दिवस झाले की प्रत्येकाला गडबड मात्र आपापल्या कामाची.
पण स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर देखील आज सुद्धा या गोष्टीबद्दल चर्चा सुरू आहे. पोलीस प्रशासन आपल्या माध्यमातून संपूर्णपणे काळजी घेत आहे. निर्भया पथकाचा माध्यमातून महिलांसाठी तात्काळ सुरक्षा उपलब्ध केली जात आहे . तरी देखील या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता वेळ आहे याच्यावरती कठोर भूमिका घेण्याची.
गुन्हेगाराला शिक्षाही झालीच पाहिजे. पण त्याच सोबत भविष्यामध्ये अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी या पिढीला शिक्षणासोबत संस्कार देण्याची गरज आहे.
सोशल मीडिया वरती वाढत चाललेली गुन्हेगारांच क्रेझ, सिरीयल, चित्रपट यांच्यामुळे बदलत चाललेली युवकांच्यातील विचारशैली, चुकीच्या प्रवृत्तीला मिळणारे चुकीचे प्रोत्साहन हे सर्व जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत या घटना घडतच राहणार.
त्यामुळे युवा पिढीला प्रबोधनात्मक व्याख्यानमाला ऐकवण्याची गरज निर्माण झाली आहे. स्त्रीचे संरक्षण स्त्रीपेक्षा आज मुलांना शिकवणे अधिक गरजेचे आहे. यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये इतिहास, भूगोल , नागरिकशास्त्र, गणित, भाषा, विज्ञान यांसारख्या विचार सोबत संस्कार या विषयाची देखील वाढ करणे गरजेचे वाटत आहे.
त्यामुळे प्रशासनासोबतच एक सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या घरातील, आपल्या परिसरातील, गावातील स्त्रीचे रक्षण करणे ही आज प्रत्येकाची नैतिक जबाबदारी झाली आहे.