महानगरपालिकेतर्फे १० हजार वृक्ष लागवडीचे नियोजन

इचलकरंजी / प्रतिनिधी

महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून हरीत इचलकरंजी शहरासाठी आम.डॉ. राहुल आवाडे यांच्या सहकार्याने यावर्षी १० हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिली.
दरम्यान, या नियोजनानुसार बुधवार, ता. ११ रोजी आयुक्त कार्यालयाने निश्चित केलेल्या नुतन शहापूर पोलिस स्टेशन नजीकच्या खुल्या जागेत आणि वाहन विभागाने निश्चित केलेल्या दाते मळा परिसरातील खुल्या जागेत आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यानी पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण त्याचबरोबर इचलकरंजी शहर स्वच्छ, सुंदर आणि हरीत करणेसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिका आणि आम. डॉ. राहुल आवाडे यांनी वृक्षारोपण करणे करिता पुरविणेत आलेल्या रोपांच्या सहकार्याने शहरात १० हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत मंगळवार, ता. १० जून रोजी वटपौर्णिम निमित्त शहरातील महिलांच्या हस्ते विविध ठिकाणी वडांच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
महानगरपालिकेच्या सर्वविभागाकडून निश्चित केलेल्या ठिकाणी संबंधित विभाग प्रमुख यांच्या नियंत्रणाखाली त्या विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचेसह शहरातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शहरातील प्राथमिक शाळा, रस्ते आणि महानगर पालिका मालकीच्या खुल्या जागेत देशी प्रजातीच्या जवळपास १०हजार रोपांचे वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले आहे.
यावेळी सहा. आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, भांडार अधिक्षक सुजाता दाभोळे, वाहन अधिक्षक प्रशांत आरगे, कर संकलन अधिक्षक दिपक खोत, सदाशिव जाधव, सहा. क्रिडा अधिकारी संजय कांबळे, प्रदीप झमरी, उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर, तेजस्विनी सोनवणे आदींसह आयुक्त कार्यालय आणि वाहन विभागाकडील अधिकारी उपस्थित होते.

Scroll to Top