शिवाजी विद्यापीठात मोत्यांची शेती!

शिवाजी विद्यापीठाने गतवर्षी गोड्या पाण्यातील मोत्यांच्या शेतीचा प्रयोग हाती घेतला. हा मोती तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. एका वर्षात मोती निर्माण करण्यात संशोधकांना यश आले आहे. विद्यापीठात पिकलेला पहिला मोती राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते भेट देण्यात आला आहे.

28 फेब्रुवारी 2024 रोजी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्राणिशास्त्र अधिविभागाच्या परिसरात गोड्या पाण्यातील मोती संशोधन केंद्राचे उद्घाटन झाले. केंद्राने महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या मान्यतेने गोड्या पाण्यातील मोत्यांविषयी संशोधन व विकासाचे काम सुरू केले. मोती क्षेत्रातील यशस्वी प्रयोगशील उद्योजक दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर शिंपल्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. योग्य देखभाल व संवर्धनामुळे शिंपल्यांपासून चांगल्या प्रकारचे मोती साकार होऊ लागले आहेत. काही शिंपले 18 महिन्यांपर्यंत ठेवण्यात येणार आहेत. गतवर्षी पाण्यात संवर्धनासाठी सोडलेल्या 100 शिंपल्यांमधील मृत्यू दर अवघा 20 टक्के आढळला. म्हणजे शंभरातील 80 शिंपले जगले. सर्वसाधारणपणे यांचा मृत्यू दर 40 टक्क्यांच्या घरात असतो. तो कमी करण्यात यश आले. त्यासाठी पाण्याच्या टाकीमधील पाणी नदीप्रमाणे प्रवाही राखले. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी सातत्याने कायम राखली. पाणी प्रदूषित होणार नाही, याची दक्षता घेत पाण्याचा दर्जा दररोज तपासून त्याचे गुणधर्म कायम राहतील, याद़ृष्टीने प्रयत्न केले. महत्त्वाचे म्हणजे, शिंपल्यांची योग्य देखभाल करताना त्यांना आवश्यक त्या प्रमाणात अन्नपुरवठा केला.

संशोधनाचा भाग म्हणून दरमहा तीन शिंपल्यांचे निरीक्षण केले व त्यांचे निष्कर्ष नोंदवले. शिंपल्यांचे वय, वजन, त्यांची संवेदनक्षमता आदी गुणधर्मांचा अभ्यास केला. त्यांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेतली. विशेषतः, हवेतील दूषित घटक पाण्यात मिसळून त्यांना कोणते विकार होणार नाहीत, याचीही काळजी घेतली.
प्री-ऑपरेटिव्ह, ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह या तिन्ही टप्प्यांमधील सर्व प्रक्रिया जंतुसंसर्गविरहित पद्धतीने होतील, याचीही दक्षता घेतली. यामुळे ही प्रक्रिया 99.05 टक्के शिंपल्यांनी स्वीकारली. हे प्रयोगाचे यश आहे, असे मोती संशोधन केंद्राचे समन्वयक तथा प्राणिशास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे यांनी सांगितले.
सर्व विभागातील भाग-2 चे विद्यार्थी नवीन शैक्षणिक धोरणास अनुसरून ऑन जॉब ट्रेनिंग आणि कौशल्यआधारित उपक्रम म्हणून मोती संवर्धन केंद्राच्या संशोधन व विकास कार्यात सहभाग नोंदवत आहेत. या प्रकल्पावर पीएच.डी.चे संशोधन सुरू आहे. पारंपरिक शेतीला पर्याय, तसेच जोडव्यवसाय म्हणून विद्यार्थी व शेतकरी या क्षेत्राची निवड करू शकतात. मोत्यांची योग्यप्रकारे शेती (लागवड) करून उत्तम आर्थिक नफा मिळू शकतो. मोत्यांच्या लागवडीसाठी फारसे भांडवल लागत नाही. केवळ जागा अगर कृत्रिम वा नैसर्गिक तलाव, प्राथमिक 25 ते 30 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून 12 ते 18 महिन्यांच्या कालावधीत 3 ते 4 लाखांचे उत्पन्न मिळू शकते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सौंदर्यालंकार, औषध क्षेत्रामध्ये दर्जेदार मोत्यांना मोठी मागणी आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये मोत्यांचे महत्त्व केवळ अलंकार म्हणून नव्हे, तर आयुर्वेदात नमूद आहे. हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या देशांमध्ये मोती संगोपन, संशोधन व उत्पादन सुरू आहे. समुद्रातील शिंपल्यांपासून मोती तयार होत असल्याचे अनेक ठिकाणी ऐतिहासिक संदर्भ सापडतात. चीनमधील शांघाय प्रदेशात गोड्या पाण्यातील शिंपल्यांसह संवर्धित मोती तयार करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. तेव्हापासून चीन जगातील सर्वात मोठा गोड्या पाण्यातील मोती संवर्धक व उत्पादक देश बनला. चीनमध्ये दरवर्षी 1,500 मेट्रिक टनांपेक्षा जास्त मोती उत्पादन होते.

Scroll to Top