कुरुंदवाड / प्रतिनिधी
शिरढोण पुलाजवळ इचलकरंजी कृष्णा-पाणी योजनेच्या बंद असलेल्या पाईपलाईनमुळे पंचगंगा नदीत जलपर्णी तुंबण्याची समस्या गंभीर बनली आहे. नदीतील पाण्याची पातळी कमी असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. प्रत्येक वर्षी या जलपर्णीचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसत असून, शेतीचे आणि सिंचन पद्धतीचे मोठे नुकसान होत आहे.
प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर साचते. पाईपलाईन आणि कठड्यांमुळे जलपर्णी अडकून राहत असल्याने समस्या अधिकच गंभीर होणार आहे. जसे पाणी वाढते, तसे जलपर्णी नदीकिनारी व शेतीत शिरते. यामुळे शेतकऱ्यांच्या मोटारी आणि पंप खराब होतात. अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात ही समस्या गंभीर बनणार आहे. या समस्येबाबत शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी यापूर्वी आंदोलन करत पाईपलाईन कट करण्यास भाग पाडले होते. मात्र, अद्याप कठडे आणि पाईपलाईन पूर्णपणे हटवण्यात आलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, इचलकरंजी पाणीपुरवठा प्रशासनाने तातडीने जलपर्णी हटवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा ती शेतीत घुसून मोठे नुकसान करेल. प्रशासनाने गंभीर भूमिका घेतली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.

