इचलकरंजी/प्रतिनिधी
इचलकरंजी शहरातील सातत्याने विस्कळीत होणारा पाणी पुरवठा सुरळीत व नियमित व्हावा यासाठी कृष्णा आणि पंचगंगा पाणी पुरवठा योजनेतील मशिनरी बदलणे व आवश्यक सुविधांसाठी 6.42 कोटी रुपयांचा निधी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून प्राप्त झाला आहे. त्यामुळे शहरवासियांना भेडसावणार पाणीटंचाईचा प्रश्न दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.
इचलकरंजी शहराला सध्या मजरेवाडी येथून कृष्णा नळपाणी पुरवठा योजना आणि पंचगंगा पाणी पुरवठा योजना यामधून पिण्याचा पाणी पुरवठा केला जातो. परंतु या दोन्ही ठिकाणी असलेले पंप व अन्य मशिनरी अत्यंत जुनी असून जीर्ण झाली आहे. त्यामुळे त्याचा पाणी उपसा आणि पुरवठ्यावर परिणाम होतो. परिणामी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होऊन पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी कृष्णा योजना बळकटीकरणासह मजरेवाडी व पंचगंगा कट्टीमोळा येथील मशिनरी बदलण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून 6.42 कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये ट्रान्सफार्मर व व्हर्टीकल टर्बाइन पंप बसविणेसाठी 4.39 कोटी, मजरेवाडी येथे उच्चदाब केबल व सीसीटिव्हीसाठी 77.24 लाख, नवीन पंपहाऊसमध्ये बसबार, विद्युत व्यवस्था व ईवोटी क्रेनसाठी 89.96 लाख आणि कट्टीमोळा येथे सीसीटिव्ही केबल व विद्युत व्यवस्थेसाठी 35.97 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. ही कामे गतीने पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे शहराला सातत्याने भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.