“पांडव पंचमी”
महाभारतातील दोन महत्त्वाचे घटक म्हणजे पांडव आणि कौरव. पांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस. श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली युद्ध करून अल्प संख्याबळ असूनही बलाढ्य अशा कौरवसेनेचा नायनाट करणार्या पांडवांनी जगासमोर मोठा आदर्श उभा केला.व्यासकृत महाभारतानुसार, हस्तिनावतीच्या सिंहासनावरून कौरव व पांडवांमध्ये युद्ध झाले, हे सर्वज्ञात आहेच. त्यावेळी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी कौरवांशी लढाई केली. राहायला छप्पर नाही, वडिलांचे छत्र नाही, पुरेसे मनुष्यबळ नाही. युद्धासाठी लागणारी दौलत नाही अशा परिस्थितीत सुद्धा कठोर परिश्रम करून हस्तिनावतीत आपले स्थान निर्माण केले.आपल्या गुणांच्या बळावर खांडवप्रस्थाचे राज्य उभे केले.
तसेच वनवासात व अज्ञातवासात जाऊन आल्यानंतर हस्तिनावतीसारख्या प्रतिष्ठित सिंहासनाला आव्हान करून सिंहासन जिंकून घेतले. भावांच्या विरुद्ध विचार आणि मतांचा आदर करत आपल्यातील एकजूट कायम ठेवली. आईचा प्रत्येक आदेश शिरोधार्य मानला. आपल्यावरील अन्यायाचे निराकरण केले. अशी गुणी व विजयी मुले आपल्यालाही व्हावीत म्हणून प्रत्येक लग्न झालेल्या आणि संतती प्राप्तीसाठी स्त्रिया घरासमोर शेणाच्या गोळ्यांचे पाच पांडव मांडतात. प्रत्येक पांडवाची पूजा करून त्यांच्यासारखं गुणी, आज्ञाधारक व बलवान मुलांनी आपली कूस उजळावी अशी प्रार्थना करते.
पांडवांसारखे गुण आपल्यात यावेत, यासाठी हा दिवस साजरा करतात, अशी मान्यता आहे. द्यूतात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवासात काढावे लागले. कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. आपण ऋषीपंचमी साजरी करतो, त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीत पांडव पंचमीदेखील साजरी केली जाते.