इचलकरंजी / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त म्हणून शुक्रवारी सातारा जिल्हाधिकारी प्रशासन कार्यालयातील सहआयुक्त अधिकारी पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला. त्यामुळे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या बदलीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.
इचलकरंजी महापालिकेच्या पल्लवी पाटील या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य राहणार असून नागरिक व महापालिका यांच्यात समन्वयासह शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नूतन आयुक्त पाटील यांनी यावेळी दिली. इचलकरंजी महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिले आयुक्त सुधाकर देशमुख यांची नियुक्ती झाली होती.
त्यांच्या बदलीनंतर आयुक्तपदी ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे कार्यभार होता. आज सकाळी पल्लवी पाटील इचलकरंजीत दाखल झाल्या. त्यांनी महापालिकेत आठ महिन्यानंतर येऊन पदभार स्वीकारला. मॅटमधील दावा मागे घेण्यात आल्याने जुन्या नियुक्तीप्रमाणेच त्यांनी पदभार स्वीकारल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. नूतन आयुक्त पाटील यांचे स्वागत उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले.
