२ ते ६ जानेवारी दरम्यान इचलकरंजीत रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन

इचलकरंजी/ प्रतिनिधी

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने २ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत स्टेशन रोडवरील केएटीपी ग्राऊंड याठिकाणी ‘रोटरी ट्रेड फेअर’ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे रोटरी ट्रेड फेअरचे २४ वे वर्ष असून इचलकरंजीकरांच्या पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन यंदाही दिमाखात साकारणार आहे, अशी माहिती रोटरी ट्रेडफेअरचे चेअरमन मनिष मुनोत यांनी पत्रकार परिषदेत देण्यात आली. ट्रेड फेअरच्या माध्यमातून मिळणारी रक्कम वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रमासाठी वापरली जाते. त्यातून गरजू लोकांना मदत, प्लॅस्टिक सर्जरी शिबिर, विविध शाळांना कॉम्प्युटर, बेंचेस, स्वच्छतागृह, डोळ्याचे मोफत ऑपरेशन, विविध वक्त्यांची व्याख्याने ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलने, विविध वैद्यकीय तपासणीद्वारे गरजू लोकांना मदत, रक्तदान शिबिर, प्रशिक्षण शिबिरे व अन्य उपक्रम हाती घेतले जातात. याठिकाणी ११२ स्टॉल असणार असून इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते, संस्थांनी आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची एकमेव व उत्तम पर्वणी आहे. पत्रकार परिषदेत संजय खोत, ट्रेड फेअर सचिव पंकज कोठारी, रोटरी क्लब अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम, सत्यनारायण धूत, नेमिनाथ कोथळे, वसंत पाटील, अभय यळरूटे, प्रकाश गौड उपस्थित होते.

Scroll to Top