इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील गावभागात विजेचे जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध करताना वीज मंडळाच्या अधिकाऱ्याने एकेरी उल्लेख केल्याने संतप्त नागरीक अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. अखेर ठेकेदाराने जुने मीटर पूर्ववत बसवण्याचे मान्य केल्याने नागरिक शांत झाले.
गावभागातील अवधूत आखाडा परिसरात कोणतीही पूर्वकल्पना न देता तसेच अनेक घरात कोणीच नसताना वीज मंडळातील अधिकारी व कर्मचारी जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत संघटीतपणे नागरिकांनी कर्मचाऱ्यांकडे विचारणा करत स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध दशर्वला. यावेळी अधिकाऱ्यांनी एकेरी उल्लेख केल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली. यावेळी काही नागरिक अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
याबाबतची माहिती समजल्यानंतर लालबावटा संघटनेचे भरमा कांबळे, धनाजी जाधव, नूरमुहंमद बेळकुडे तेथे आले. त्यांनीही अधिकाऱ्यांना पूर्वसुचना न देता मीटर का बसवले जात आहेत असा जाब विचारला. तसेच काढलेली जुनी मीटर त्वरीत पूर्ववत बसवावीत आणि यापूर्वी न विचारता काढलेले जुने मीटरही पूर्ववत बसवण्याची मागणी केली. संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी ते मान्य केले. यावेळी विनायक जाधव, बाळासो कोले, अरुण घाटगे, शंकर कलबुर्गे, प्रकाश नलावडे, रामचंद्र सौत्ते, अजित कांबळे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते.

