इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरातील रस्ते, पर्यावरण, ड्रेनेज इत्यादी विकास कामांसाठी ७०० कोटी तसेच महानगरपालिकेची थकीत परतावा. १०७७ पैकी ६५७कोटी रूपये नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतल्याबद्दल आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने कौन्सिल हॉल मध्ये सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील होत्या.
स्वागत व प्रास्ताविक म्युनिसिपल वर्कर्स युनियनचे अध्यक्ष के. के. कांबळे यांनी केले. तर प्रा. ए. बी. पाटील, शामगोंड पाटील, नौशाद जावळे, संजय शेटे, कृष्णात गोंदुकूप्पे, धनंजय पळसुले यांची भाषणे झाली. त्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा शाल, श्रीफळ व फोटो भेट देवून सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना आम. आवाडे म्हणाले, गेल्या सहा महिन्यांत शहरासाठी केलेल्या विविध विकास कामांचा उल्लेख करीत त्यासाठी निधी मंजूर करून घेताना आलेल्या अडचणीवर मार्ग काढून निधी प्राप्त करून घेतला असल्याचे सांगितले.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी, आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी तत्परतेने पाठपुरावा करून विकास निधी ७०० कोटी, त्याच बरोबर थकीत १०७७ कोटी परतावा पैकी ६५७ कोटी रु मंजूर घेतल्याबद्दल आभार मानले.
समारंभास सर्व युनियनचे पदाधिकारी व सदस्य संपत तांबिरे, संजय कांबळे, सचिन घोरपडे, दशरथ जावळे, संजय पाटील, अल्लाउद्दीन जमादार, आकाश माने, युवराज भोसले, संतोष पसोबा, संतोष कांबळे, राजू जमादार, राहूल पांढरपट्टे, श्रीकांत पाटील त्याचं बरोबर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राज्य समन्वय समितीचे सदस्य हरी माळी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन म्युनिसिपल वर्कर्स युनियनचे खजिनदार सचिन खोंद्रे यांनी केले.

